"कोल्हापूर चे मूळ नाव 'कलापूर' असे करा"

ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी केली मोठी मागणी

"कोल्हापूर चे मूळ नाव 'कलापूर' असे करा"

कोल्हापूर म्हणजे कलेचे माहेरघर ! मराठी चित्रपटसृष्टीचा पाया कोल्हापूर शहरात बाबुराव पेंटर यांनी घातला. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर चित्रनगरीला बाबूराव पेंटर यांचे नाव द्यावे, अशी आग्रही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होती. अशात कोल्हापूर शहराचे नाव बदलून ‘कलापूर’ असं करा, अशी मागणी अभिनेते सचिन पिळगावकरांनी केली. त्यामूळे कोल्हापूर शहराच्या नामांतराचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आलाय.

नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना अभिनेते सचिन पिळगावकर यांनी ही मोठी मागणी केली. चित्रपट महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष अजय सरपोतदार यांनी २००९ मध्ये चित्रनगरीला ऊर्जितावस्था आणण्यासाठी प्रयत्न करताना चित्रनगरीला बाबुराव पेंटर यांच्या नावाची घोषणा केली होती. मात्र पुढे काहीच झाले नाही. चित्रनगरी आता कात टाकत असताना अभिनेते सचिन पिळगावकरांनी ही मोठी मागणी केलीय. यावेळी बोलताना अभिनेते सचिन पिळगावकर म्हणाले, “कोल्हापूर असं त्या शहराचं नाव कधीच नव्हतं. चित्रपट निर्मितीचा गाव म्हणून त्या शहराचं ऐतिहासिकत्व आहे. अनेक कलावंतांनी तिथे चित्रपटक्षेत्रातील महत्त्वाचे पहिलेवहिले प्रयोग केले आहेत, सर्व प्रकारचे कलाकार तिथे घडले आहेत. त्यामूळे त्या शहराला लोक ‘कलापूर’ असं म्हणत होते. ज्याप्रमाणे इंग्रजांनी ‘मुंबई’ शहराचं नाव उच्चारताना बदलून ‘बॉम्बे’ असं केलं होतं, अगदी त्याचप्रमाणे ‘कलापूर’ शहराचा उच्चार वेगळा करत त्यांनी ‘कोल्हापूर’ असं केलं.” त्यामूळे कोल्हापूर शहराचं नाव जे पूर्वीचं होतं तेच ‘कलापूर’ असं करावं, अशी मागणी  त्यांनी केली. यासाठी ते स्वतः प्रयत्न करणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं.