‘टकाटक २’चे पहिले शूटिंग शेडयूल गोव्यात पूर्ण

‘टकाटक २’चे पहिले शूटिंग शेडयूल गोव्यात पूर्ण
‘टकाटक २’चे पहिले शूटिंग शेडयूल गोव्यात पूर्ण

कोरोनाच्या भयग्रस्त वातावरणातही काही सकारात्मक पावलं सिनेसृष्टीमध्ये नवचैतन्य निर्माण करणारी ठरत आहेत. ‘टकाटक २’ या आगामी मराठी चित्रपटानंही सकारात्मक पाऊल टाकत मराठी सिनेसृष्टीत उत्साह निर्माण करण्याचं काम केलं आहे. दोन वर्षांपूर्वा जेव्हा ‘टकाटक’ प्रदर्शित झाला होता, तेव्हा मराठी सिनेसृष्टीला बॉक्स ऑफिसवर हिट ठरणा-या एका चित्रपटाची नितांत गरज होती. ‘टकाटक’नं ती पूर्ण केली. आता कोरोनामुळं संपूर्ण सिनेसृष्टीमध्ये मरगळ आलेली असताना ‘टकाटक २’च्या टीमनं उत्साहवर्धक पाऊल उचलत गोव्यामध्ये शूटिंगचं पहिलं शेडयूल यशस्वीपणे पूर्ण केलं आहे. वाढत्या कोरोना केसेसमुळे गोव्यामध्ये रात्रीचा कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. गोव्यात 21 एप्रिल ते 30 एप्रिल 2021 पर्यंत नाईट कर्फ्यू सुरू राहणार आहे. आता गोव्यातही कडक निर्बंध लागू केले जात असताना तिथले शूटिंग पूर्ण झाल्याने ‘टकाटक 2’ची टीम एकप्रकारे सुदैवी ठरली आहे.

पर्पल बुल एंटरटेनमेंट प्रा. लि.च्या बॅनरखाली ‘टकाटक २’ची घोषणा करण्यात आल्यानंतर लगेचच गोव्यामध्ये मुहूर्त करून शूटिंगचा श्रीगणेशा करण्यात आला होता. ओमप्रकाश भट्ट आणि धनजंय सिंग मासूम यांची निर्मिती तसेच जगत सिंग यांची सहनिर्मिती असलेल्या ‘टकाटक २’च्या टीमनं गोव्यामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील सर्व सरकारी नियमांचं अतिशय योग्य पद्धतीनं आणि काटोकोरपणे पालन करत शूटिंग पूर्ण केलं आहे. ‘टकाटक २’च्या माध्यमातून पुन्हा एकदा दिग्दर्शक मिलिंद कवडे प्रेक्षकांसाठी काहीतरी नावीन्यपूर्ण घेऊन येत आहेत. पहिल्या भागाप्रमाणे दुस-या भागातील कथानकही अर्थातच तरूणाईवर आधारित आहे. असं असलं तरीही तरूणाईपासून थोरांपर्यंत सर्वचजण ‘टकाटक २’च्या कथानकाशी एकरूप होतील. महाराष्ट्रात शूटिंगला बंदी आहे, पण गोव्यामध्ये ‘टकाटक २’चं चित्रीकरण करताना संपर्ण टीमनं योग्य ते सहकार्य केल्यानं कोणतीही अडचण न येता पहिलं शेड्यूल पूर्ण करू शकल्याचं समाधान मिलिंद कवडे यांनी व्यक्त केलं आहे. सर्वच कलाकारांनी उत्तम अभिनय करत अगदी ठरलेल्या वेळेत शेडयूल पूर्ण केलं आहे. गोव्यातील निसर्गरम्य वातावरणाशी एकरूप होत कलाकारांनी भन्नाट अभिनय करत एक वेगळंच रसायन सादर केलं आहे, ज्याचा अनुभव प्रेक्षकांना सिनेमा पाहताना नक्कीच येईल. सर्व तंत्रज्ञांचीही सुरेख साथ लाभल्याचं यावेळी मिलिंद कवडे म्हणाले.

प्रेक्षकांचा लाडका अभिनेता प्रथमेश परब पुन्हा एकदा या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत रसिकांचं मनोरंजन करणार असून अक्षय केळकर, अजिंक्य राऊत, भूमिका कदम, प्रणाली भालेराव, कोमल बोडखे, भारत गणेशपुरे, आशा शेलार, किरण माने, पंकज विष्णू, निशा परूळेकर, राहुल बेलापूरकर, किरण बेरड, आरजे महेश काळे, अभय कुलकर्णा आणि इतर कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. ‘टकाटक २’ची कथा आणि पटकथालेखन मिलिंद कवडे यांनी केलं असून संवादलेखन किरण बेरड यांनी केलं आहे. हजरत शेख वली या चित्रपटाचे डीओपी आहेत तर निलेश गुंडाळे यांनी कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी सांभाळली आहे. गीतलेखन जय अत्रे यांनी केलं असून वरूण लिखते यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. गोव्यातील शूटिंग शेडयूल यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर ‘टकाटक २’ची टीम मुंबईत परतली आहे. सध्या लॉकडाऊनचं वातावरण असल्यानं त्यानंतर पुढील शेडयूलची आखणी करण्यात येणार आहे.