अनिता दातेची भावनिक पोस्ट : "राधिका सुभेदार ची आठवण येईल"

अनिता दातेची भावनिक पोस्ट : "राधिका सुभेदार ची आठवण येईल"

मराठीच्या छोट्या पडद्यावर प्रसिद्धीच्या अव्वल स्थानावर दीर्घकाळ राज्य करणारी मालिका 'माझ्या नवऱ्याची बायको' चा शेवट झाला. ह्या मालिकेने आणि त्यातील कलाकारांनी सलग पाच वर्षे यशस्वीपणे प्रेक्षकांचे मनोरंजन केले. या मालिकेमुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली राधिका म्हणजेच अभिनेत्री अनिता दातेने, या मालिकेतील तिच्या प्रदीर्घ कारकिर्दीतील प्रवासात सोबत राहिलेल्या तिच्या सहकाऱ्यांचे आणि प्रेक्षकांचे  पत्राद्वारे आभार मानले आहेत. 

तीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे भलेमोठे पत्र खास प्रेक्षकांसाठी शेअर केले आहे. ती याद्वारे म्हणते, "मी या घरची राणी माझ्या राजाला शोभते.... आमचं टायटल सॉंग आज शेवटचं टीव्हीवर एपिसोड च्या सुरुवातीला लागलं.२२ ऑगस्ट २०१६ ला सुरू झालेला हा माझ्या नवऱ्याची बायको चा प्रवास आज संपतोय. सर्व प्रेक्षकांचे मनापासून आभार साडेचार वर्षांत तुम्ही प्रेक्षकांनी आमच्यावर भरभरून प्रेम केलं.. कौतुक केलंत म्हणून हे शक्य झालं."

 

 

तिच्या या मालिकेतील एकंदरीत प्रवासाबद्दल देखील ती व्यक्त झाली आहे, ती पुढे म्हणते, " ह्या दिवसांनी कलाकार म्हणून मला खूप काही दिलं. नाव मिळालं...राधिका म्हणून ओळख मिळाली.. अभिनेत्री म्हणून खूप काही शिकायला मिळालं..अनेक अनुभवांनी समृद्ध केलं.. जीवाभावाचे मित्र-मैत्रिणी मिळाले - समजून घेणारे, चुकलो तर चूक दाखवून देणारे, कौतुक करणारे आणि शिव्या घालणारे. हे सगळं मी मिळवलं आहे. हे माझ्याकडे कायम असणार आहे.पण ह्या नंतर राधिका सुभेदार ही भूमिका साकारायला मिळणार नाही.आठवण येईल. इतकी छान,लाघवी भूमिका मला साकारायला मिळाली ह्या साठी मी निलेश मयेकर , सोजल सावंत , अंकुर गंभीरे , सिद्धार्थ मयेकर आणि झी मराठी च्या संपूर्ण टीम ची मी आभारी आहे. माझे निर्माते तेजेंद्र नेसवणकर, सुवर्णा मंत्री ह्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. रोहिणी ताई नी राधिका इतकी छान मांडली होती ...फक्त राधिका नाही तर प्रत्येक पात्र. गुरू ,शनाया, रेवती ,समिधा ,नाना नानी, महाजनी काका काकू , आनंद ,जेनी , श्रेयस , पानवलकर ....सगळी सगळी पात्र. त्यासाठी खूप खूप प्रेम रोहिणी ताई . अभिजीत गुरू ने सुरुवातीच्या काळात संवाद लेखन केलं आणि नंतर त्याच बरोबरीने पटकथा सुधा लिहिली खूप उत्तम. मनीष कदम ,अस्मिता ह्यांनी मोलाची साथ दिली . अद्वैत दादरकर ने सगळ्यात शेवटच्या आणि अवघड काळात पटकथा लिहिली आणि मालिकेला refresh केलं.

केदार वैद्य आणि त्याच्या सोबत आशुतोष बावीस्कर, सागर सकपाळ ह्यांनी हे पात्र साकार करण्यासाठी योग्य दिशा दिली . हेमंत सोनावणे , अनिकेत झेले, विजय पेडणेकर ह्यांनी साडेचार वर्षं आम्हा सगळ्यांना सांभाळून घेत हे काम सुविहित कसं होईल ह्या साठी अपार परिश्रम घेतले आमचे लाड केले...ह्या दरम्यान किती तरी मोठे कलाकार आले ह्या मालिकेचा भाग झाले त्यांच्या असण्याने ह्या मालिकेला प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळालाच पण मला सुद्धा मज्जा आली, समाधान मिळालं. ह्या सगळ्यासाठी, अनुभवासाठी मालिकेशी संबंधित सगळ्यांचे आणि प्रेक्षकांचे मनापासून आभार"

तत्पूर्वी, अभिजित खांडकेकरने देखील मालिकेच्या शेवटच्या भागादरम्यान संपूर्ण टीम आणि त्याच्या चाहत्यांचे आभार मानत भाऊक पोस्ट लिहिली होती. २०१६ साली ओनएअर गेलेल्या या मालिकेने महाराष्ट्रातील लाखो प्रेक्षकांचे मन जिंकली आहेत.