‘बॉम्बे बेगम’ वेब सीरीजला सरकारकडून नोटीस!

बॉलिवूडनंतर आता सरकारची ओटीटी प्लॅटफॉर्मवर कडक नजर 

‘बॉम्बे बेगम’ वेब सीरीजला सरकारकडून नोटीस!

'तांडव' वेबसीरीज वादानंतर सरकार ओटीटी प्लॅटफॉर्मवर कडक नजर ठेवण्याच्या प्रकरणात वेगाने हालचाल करीत आहे. अ‍ॅमेझॉन प्राईमनंतर आता  नेटफ्लिक्सवर देखील सरकारने मोर्चा वळवला आहे. चाईल्ड कमिशनने केलेल्या आरोपाच्या आधारे नेटिफ्लिक्सला त्यांच्या ‘बॉम्बे बेगम’ या वेब सीरीजच्या कंटेंटविषयी सरकारकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. तसेच, त्यांना पुढील २४ तासात त्यासंदर्भात अहवाल सादर करण्यासदेखील सांगितले आहे. नेटफ्लिक्सची ही वेब सीरीज ८ मार्च रोजी प्रदर्शित झाली होती. ज्यानंतर आता बाल आयोगाने हे कठोर पाऊल उचलले आहे. 

चाईल्ड कमिशनने नेटफ्लिक्सला नोटीस पाठविली असून ‘बॉम्बे बेगम’ने प्रसारण थांबवावे आणि पुढील २४ तासात अहवाल द्यावा, अशी नोटीस जारी केली आहे. बाल आयोगाकडे आलेल्या तक्रारीनुसार या वेब सीरीजमध्ये १३ वर्षाची लहान मुलगी ड्रग्ज घेत असल्याचे दाखवण्यात आले आहे. यासह शालेय मुलांचे अतिशय चुकीचे चित्रण करण्यात आले असल्याचा आक्षेप आहे.

यापूर्वी ओटीटी प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉनवरच्या ‘तांडव’  वेब सीरीजसाठी कारवाई करण्यात आली होती. ‘तांडव’ बद्दल बराच गोंधळ झाला होता. यानंतर अ‍ॅमेझॉनच्या वतीने या वेब सीरीजचे दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी माफी मागितली होती. 

नेटफ्लिक्स सीरीज ‘बॉम्बे बेगम’ ही अलंकृता श्रीवास्तव यांनी दिग्दर्शित केली आहे. या सीरीजमध्ये पाच वेगवेगळ्या महिलांची कहाणी दर्शवली गेली आहे. अभिनेत्री पूजा भट्टने या वेब सीरीजमधून कमबॅक केले आहे. या वेब सीरीजमधील पूजा भट्ट व्यतिरिक्त सुहाना गोस्वामी, अमृता सुभाष, अधिया आनंद यांच्यासह अनेक मोठे चेहरे आहेत 

बाल हक्कांच्या संरक्षणासाठी एनसीपीसीआर ही सर्वोच्च संस्था आहे. प्रेक्षकांच्या तक्रारी आधारे कमिशनने नेटफ्लिक्सला नोटीस पाठविली आहे. तक्रारीत असा आरोप केला गेला आहे की, या मालिकेत अल्पवयीन मुलांचे अनैतिक लैंगिक संबंध आणि त्यांनी मादक पदार्थांचे सेवन केल्याचे दाखवण्यात आले आहे. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने या मालिकेतल्या मुलांच्या कथित अनुचित चित्रणावर आक्षेप घेताना म्हटले आहे की, अशा सामग्रीमुळे केवळ तरुणांच्या मनावर परिणाम होणार नाही तर, यामुळे मुलांचे शोषण देखील होऊ शकते.