'जीव झाला येडा पिसा'चा हिंदी रिमेक 'बावरा दिल'

लेखक-अभिनेता चिन्मय मांडलेकरने दिली आनंदवार्ता

'जीव झाला येडा पिसा'चा हिंदी रिमेक 'बावरा दिल'

प्रेक्षकांना आपल्या विशिष्ठ गोष्टींमुळे आपल्यामध्ये गुंतवून ठेवण्यास काही मालिका यशस्वी झाल्या आहेत, ज्यात जीव झाला वेडापिसा या मालिकाच देखील समावेश आहे, ह्या मालिकेची प्रसिद्धी लक्षात घेता हिंदी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी हि मालिका एका नव्या रुपात सज्ज झाली आहे. 'जीव झाला येडा पिसा' ही मालिका 'बावरा दिल' द्वारे हिंदीच्या छोट्या पडद्यावर झळकणार असल्याची आनंदवार्ता मालिकेचा लेखक आणि अभिनेता चिन्मय मांडलेकरने आपल्या सोशल मिडिया पोस्टमधून दिली होती. 

काही दिवसांपूर्वी जीव झाला येडा पिसा मालिकेचे ५०० भाग पूर्ण झाल्याच्या निमित्ताने चिन्मयने ही पोस्ट केली होती.  'जीव झाला येडा पिसा' आणि 'बावरा दिल' चे पोस्टर इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत लिहिले, "आज रात्री जीव झाला येडा पिसा ५०० भाग पूर्ण करत आहोत. याच दिवशी त्याचे 'बावरा दिल' असे हिंदीत नामकरण होत आहे. अभिनंदन टीम" 

आपल्या आशयसमृद्ध कथेमुळे जीव झाला येडा पिसा या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले आहे. विदुला चौघुले, अशोक फळदेसाई आणि चिन्मयी सुमित राघवन यांची मुख्य भूमिका यात आहे. या मालिकेच्या संपूर्ण टीमला हिंदी रिमेकबद्दल खूप आनंद झाला आहे. ही मालिका कलर्स हिंदी वाहिनीवर २२ फेब्रुवारी पासून सुरु झाली आहे. 


 

 

 

 

 

 

 

 

 

या मालिकेची कथा संक्षिप्तरुपात मांडली तर शिव हा एक कठोर काळजाचा रांगडा गडी आहे, तर सिद्धी तत्व आणि धोरणाने चालणारी मुलगी आहे. दोघांचे व्यक्तिमत्व परस्परविरुद्ध आहे. परंतु, एका घटनेमुळे या दोघांना एकमेकांशी लग्न करण्यास भाग पाडले जाते. पुढे त्यांच्या वैवाहिक जीवनात संघर्ष सुरु होतो. दोघांच्या विवादास्पद व्यक्तिमत्वामुळे ही दोघ एकमेकांच्या विरुध्द उभे ठाकतात. काही काळानंतर त्यांच्यातला संघर्ष आणि गैरसमज मावळतो आणि एकमेकांच्या प्रेमात पडतात खरे, परंतु त्यांच्या नात्यात कोणते न कोणते वादळ येऊन उभे राहत असते.  

बर्‍याच लोकप्रिय मालिकांच्या रिमेकने शो मेकर्स प्रेक्षकांचे भरघोस मनोरंजन करत आहेत. 'आई कुठे काय करते' ही मालिका बंगाली मालिका 'श्रीमॉयी' चा मराठी रीमेक तर आहेच, पण त्यासोबतच 'अनुपमा' नावाने हि मालिका हिंदीत देखील गाजत आहे. तसेच सहकुटुंब सहपरिवार ही तामिळ मालिका 'पांडियन स्टोअर'चा रिमेक आहे.